सोमवार, 3 दिसंबर 2018

प्रवास... (काल्पनिक कथा) (Marathi Stories )

प्रवास... (काल्पनिक कथा)

दिपिका आस्वार
भाग १ व २.

उन्हाळ्याचे दिवस होते.... परिक्षा संपली असल्या कारणाने हॉस्टेलला सुट्टी लागली होती... सर्व जण आपापल्या घरी गेले होते... पण काही मुलं कुठेही न जाता रुम मध्येच होती... कदाचित त्यांना आपलं असं कोणी नसावं... रोहन आणि प्रवीण पण गावी जायच्याच तयारीत होते,,, पंधरा दिवसांनी रोहनच्या बहिणीच लग्न होतं... त्याला मदत म्हणून प्रवीण त्याच्या सोबत चालला होता,, प्रवीण हा त्याचा जिवलग मित्र... त्यांनी भराभर सगळी आवरा आवर केली... सकाळीच रोहनच्या आईने त्याला फोन करून सांगितले होती की,,, तुझ्या ताईच लग्न ठरलंय... लवकर ये इकडे.... सुट्टीमध्ये कुठेही जायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं.... पण आता तर त्यांना जावंच लागणार होतं... गावी जाण्यासाठी सहा ते सात तास लागत असे.. त्यातही बस वेळेवर आली तर ठीक,,, नाही तर अर्धा ते पाऊण तास बस स्टॉप वरच बसावं लागायचं... ती बस ठरावीक ठिकाणीच थांबायची... ते दोघं दुपारी दोन वाजता निघणार होते... अजूनही त्यांच्याकडे एक ते दीड तास होता... सगळं घेतलंय ना.. ते बघण्यासाठी ते पुन्हा बॅग पाहू लागले... त्याच गडबडीत असताना त्यांना कोणीतरी हाक मारली.... रोहन...... प्रवीण...... तसं त्यांनी मागे पाहिले... तर मागे जीन्स-टॉप घातलेली एक काळी सावळी मुलगी त्यांच्याकडे बघून स्माईल देत उभी होती.... त्यांनीही तिला किंचित स्माईल दिली आणि "आत ये" अस बोलून पुन्हा आपलं काम करत बसले... कुठे चाललाय का तुम्ही... बॅग का भरून ठेवल्या आहेत??? एका मागून एक असे प्रश्न ती त्यांना विचारत होती.... पण ते शांतपणे रूम आवरत होते... अरे सांगा ना,,,, पळून तर नाही ना चालले तुम्ही.... असे असेल तर मी पण येऊ का तुमच्या सोबत...?? तिने एक भुवयी उडवत त्यांना विचारले.... तसे ते दोघ तिला बघून मोठ्याने हसू लागले.... त्यांचं ते हसणं बघून ती खूप चिडली.... त्यांना बडबडतच ती रूम बाहेर जाणार तितक्यात प्रवीण म्हणाला,,,, अगं थांब नकटे.... किती राग ग तुझ्या ह्या नकट्या नाकावर.... असं म्हणत त्याने तिचे नाक जोरात ओढले.... आ,,,, ओरडत तिने त्याला एक फटका लावून दिला.... सांग ना कुठे जाताय तुम्ही??? अगं पंधरा दिवसांनी रोहनच्या ताईच लग्न आहे म्हणून गावी चाललोय..... वेडाबाई,,,, अस म्हणत तो गादीवर बसला... मी पण येऊ का??? ती रोहनकडे बघत म्हणाली....तो काही बोलणार तेवढ्यात प्रवीण म्हणाला,,, नको... नको.... तुझ्या सारख्या नकटीला कोण सोबत घेऊन जाईन... आणि एकटाच हसू लागला... हो-हो... आणि तू नेपाळी... हिहीही... दात दाखवत ती हसली...तुझे आई-बाबा तुला आमच्या सोबत इतक्या लांब पाठवतील का?? रोहनने प्रश्नार्थक नजरेने विचारले... तशी ती लगेच हो म्हणाली... ह्या आधी ही आई बाबांनी मला तुमच्या सोबत पाठवलं आहे... आताही पाठवतील... तसंही त्यांना तुम्ही आणि तुमचा स्वभाव खूप आवडतो.... तर मग,, ठीक आहे.. त्यांना विचार आणि सगळं आवरून इकडेच ये.... ते ही लवकर... तशी ती पटकन निघून गेली...

ह्यांच सगळं आवरून झालं होतं,,, ते तिची वाट बघत होते... फक्त पाऊण तास उरला होता.... दहा मिनिटं झाली तरी ती आली नाही... प्रवीणने तिला कॉल केला.... कॉल रिसीव करत ती म्हणाली हॅलो,,, बोल प्रवीण... अगं आहेस कुठे??? बस भेटली पाहिजे आपल्याला.... लवकर ये.... त्याच बोलणं पूर्ण होताच ती म्हणाली... तुम्ही बस स्टॉप जवळ थांबा... मी बाबांना घेऊन येते आणि कॉल कट केला... काय म्हणाली ती,, निघाली का?? रोहनने विचारले... हो... तिने आपल्याला बस स्टॉप जवळ थांबायला सांगितलं आहे.. ती आपल्याला तिथेच भेटेल म्हणाली... तसे दोघांनीही आपापल्या बॅग खांद्यावर लटकवल्या आणि रूम बाहेर आले... रोहनने रूमला कुलूप लावले... आणि ते रिक्षानेच बस स्टँड जवळ आले... १५ मिनिटाने बस येणारच होती पण त्रिवेणी अजून आली नव्हती.. दोघांचंही लक्ष तिच्या येण्याकडे होतं.. बघता बघताच ५ मिनिट निघून गेले.. प्रवीण म्हणाला.. तुला वाटतं का,,,ती येईल.?? वाटतं का काय,,, ती आली बघ... अस म्हणत रोहन समोरच बघत होता.. प्रवीणने ही त्यांना पाहिलं...ती आणि तिचे बाबा कार मधून खाली उतरले... त्या दोघांकडे बघत तिचे बाबा म्हणाले.... कशी गेली परीक्षा?? चांगली गेली,,, अस म्हणत त्यांनी एकमेकांकडे पाहिले... म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट होणार तर... असं म्हणत त्यांनी रोहनच्या पाठीवर जोरात थाप मारली... तेवढ्यात बस आली... तसे सगळेच जमा झाले... नीट जा पोरांनो... कुठे पण थांबू नका,,, काही झालं तर लगेच मला फोन करा.... असे ते ओरडून त्यांना सांगत होते... तसे तिघंही मान हलवत हो हो म्हणत बसमध्ये गेले.... खूप गर्दी होती... नशिबाने त्यांना बसच्या मागच्या सीटवर बसायला भेटले....बरं झालं ना,,, आपल्याला बसायला जागा भेटली.... गर्दीला बघतच त्रिवेणी म्हणाली.... हो ना... बरं झालं तू अजून लवकर आली नाहीस... नाही तर आपल्याला बाहेरच उभं राहावं लागलं असतं... नाही का??? तशी ती रागवत तिरक्या नजरेने त्याला बघू लागली... तो हसतच होता... तू गप रे माकडा...... जेव्हा बघावं तेव्हा तुझी टीवटीव चालू असते... तिच्या ह्या बोलण्यावर त्याने तिला एक टपली मारली.... पण रोहन मात्र शांतच बसून सगळीकडे नजर फिरवत होता..... प्रवासाला सुरुवात झाली तसा बसमधला गोंगाट ही काहीसा कमी झाला... खिडकीतून बाहेर पाहिलं तर झाडे मागे मागे पळताना दिसत होती... ऊन कमी झाले होते.... तरीही थोडं फार गरम होतंच होतं.... पण खिडकीतून अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक अंगाला गारवा देत होती... प्रवास तर चांगला सुरू होता पण पुढे काय घडणार?? ह्याची साधी कल्पनाही नव्हती कोणाला......
*क्रमशः...*
---------------------------------------------------

भाग २


अजूनही बसमध्ये कुजबूज चालूच होती.... मधेच कोणाचा तरी हसण्याचा आवाज येत होता... तर कधी लहान मूल रडण्याचा..... प्रवीण आणि त्रिवेणी भांडण्याच्या मूड मध्ये होते.... पण रोहनची नजर समोर बसलेल्या त्या मुलीकडे होती.... कोणी ना कोणी मध्ये यायचं तरीही तो नजर इकडे तिकडे करून तिलाच बघायचा प्रयत्न करत होता.... काय रे रोहन,,, लक्ष कुठे आहे तुझं....??? अस म्हणत प्रवीणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.... कुठे काय,,, काहीच नाही असं म्हणून तो मोबाईल मध्ये बघू लागला.... ये काय चाललंय तुमचं??? त्रिवेणीने विचारलं.... तुला इथेच सोडून जायचा विचार चाललाय आमचा... त्याच्या ह्या बोलण्याने रोहनही हसू लागला... जोक होता हा?? अस म्हणत ती पुन्हा खिडकीकडे पाहू लागली.... आणि रोहन त्या मुलीकडे... तितक्यात प्रवीनच लक्ष त्या मुलीकडे गेले... ओह्ह,,, म्हणजे साहेबांचं लक्ष इकडे आहे तर..... रोहनकडे नजर टाकत तो म्हणाला... ए मंद,,, तुला एक गोष्ट सांगू का?? नको सांगू.. मला नाही ऐकायचं काही.... ती नाक मुरडतच म्हणाली.... अगं ऐक तर... समोर त्या मुलीला बघ ना... काय करू तिला बघून?? ठीक आहे नको बघू.... मी आणी रोहन बघतो.... लगेच ती त्यांना मागे सारून त्या मुलीला बघू लागली.... आई ग,,, अगं म्हशे,,, बाजूला हो...... नाही तर आमचा पापड होईल... त्याच्याकडे बघत ती मागे सरकली... भारी दिसते ना ती,, प्रवीण म्हणाला... इतकी पण खास नाही.... तू तर अप्सराच ना... अय्या खरंच.... हाट,,,, काळे.... बाजूला हो नाही तर मला तुझा रंग लागेल... आणि हसला... ती चिडून काही न बोलता शांत बसली.... तेवढ्यात कंडक्टर तिकीट,,, तिकीट... बोलत समोर येऊन उभा राहिला... कुठे जायचंय तुम्हांला??? त्याने रोहनला विचारले" येनव्याल्या." किती पाहिजे... तीन द्या... तीन तिकीट देऊन,, पैसे घेऊन तो पुढे गेला... बसमध्ये बसून दीड तास होऊन गेला होता... मला खूप भूक लागली आहे,, त्रिवेणी म्हणाली.... मला ही.... नाही तरी तू बकासूरच आहेस आणि तू भुक्कड... हे.. हे..हे करत दोघ हसले... अर्ध्या तासाने पुढच्या स्टॉपला बस थांबेल तेव्हा खा पाहिजे तेवढं... रोहन म्हणाला तसे दोघही शांत बसले... हॅलो... भाऊ.. तू मला घ्यायला येतोय ना... पोहचले की सांगेल तुला... दोन तास तरी लागतील... असं म्हणत तिने कॉल ठेवला.. ती एकटीच होती .. तिच्या बोलण्याने एवढं तर कळलं होतं की,, ती अजून दोन तास तरी सोबत आहे.. बघताच क्षणी त्याला ती आवडली होती..
तेवढ्यात कर्र,,,कर्र,,, आवाज होत बसला ब्रेक लागला... तसे उभे असलेले प्रवासी धाडकन एकमेकांना आदळले..आणी बसलेले पुढच्या सीटला.... चला लवकर उतरा खाली.. काय खायचं प्यायचं असेल, ते करून घ्या.... गाडी फक्त वीस मिनिट इथं थांबणार आहे... परत दोन तास तरी गाडी कुठेही थांबणार नाही... कंडक्टर असं ओरडून ओरडून सगळ्याना सांगत होता...तशी सगळीच बस रिकामी झाली... सगळे जण बसून आणि उभे राहून कंटाळले होते... कोणी जांभई देत पुढे जात होत तर कोणी पेंगाळत... समोरच एक ढाबा होता... त्याच्या बाजूला मोठं गार्डन होतं... पण ऊन असल्याने सगळे आत गेले.... तुम्हाला जे पाहिजे ते खा..... मी आलोच असं म्हणत रोहन निघून गेला.. ती त्यांच्या पासून थोड्या अंतरावर बसली होती... तिला बघून तो परत आला.. तू पण खाऊन घे रोहन.. जायचंय आपल्याला... ती सहज दिसेल अशा प्रकारे तो बसला... लवकर लवकर जेवण करून ते बसमध्ये गेले.. काही माणसं आधीच येऊन बसली होती..थोड्या वेळाने उरलेली माणसं पण आली.. . आपल्या आजू बाजूला बघा.. सगळेआलेत का?? कंडक्टरने विचारले... कोण काही म्हणाल नाही.. पण ती अजून आली नव्हती... कुठे असेल ही.. रोहन त्याच विचारात असताना ती धावतच आत आली... धापा टाकत टाकतच ती जागेवर बसली... अजून कोण राहिलय का...? कंडक्टरने बेल वाजवली आणि गाडी पुन्हा रस्त्याला लागली... तिला बघून त्याला बर वाटलं... मागे वळून त्याला पाहून ती किंचित हसली... तो तर तिला बघत बसला... त्याला विश्वासच बसत नव्हता... म्हणजे ही पण.... मनातल्या मनातच तो खुश झाला... हसली म्हणजे पटली ना भावा... अस म्हणत प्रवीण गाणं म्हणू लागला... एक नजर मैं भी प्यार होता है,,, मैंने........ तो पुढे बोलणार तितक्यात रोहनने हात ठेवून त्याच तोंड बंद केलं... ते बघताच त्रिवेणी हसू लागली,,, त्याने लाजून मान खाली घातली....
*क्रमशः...*
मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की... "प्रवास" ह्या कथेतून तुम्हाला हवी असणारी भीती आणि रोमांचक थरार लगेच तरी अनुभवता येणार नाही... प्रवासामधील त्यांची मैत्री, भेट आणि त्यांचं प्रेम ह्या सर्वाचं वर्णन करण्यासाठी मला कथेचे दोन भाग तरी त्यासाठी द्यावे लागतील.. तसेच तुम्हाला ही कथा नक्की आवडेल...
Image may contain: tree, outdoor, text and nature

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Thank you for comment.